मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाशेजारी इतर रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्याकडील चार्ज काढून नायर रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याकडे देण्यात आला आहे.
मृतदेहा शेजारी उपचार: सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्याला भोवले, तातडीने केली बदली - dr. pramod ingle
सायन रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर आज रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्याकडील चार्ज काढून नायर रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याकडे देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचे सायन येथे लोकमान्य टिळक रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र या रुग्णालयात प्लास्टिकमध्ये बांधून ठेवलेल्या कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहांशेजारी इतर रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आमदार नितेश राणे यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडीओमुळे महापालिका आणि रुग्णालयावर मोठी टिका झाली आहे. याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. तसेच या व्हिडिओची सत्यता पडताळून दोषींवर कारवाई केली जाईल, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.
कोरोना मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार करण्याचा प्रकार रुग्णालयाच्या अंगलट आला आहे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्याकडून डीन पदाचा चार्ज काढून घेण्यात आला आहे. नायर रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून करण्यात आली असून त्यांनी पदभार चार्ज स्वीकारला आहे.
हेही वाचा -मुंबईमध्ये स्थलांतरीत कामगारांच्या रेल्वे तिकिटांसाठी 'एक तिकीट माणुसकीचे' मोहीम सुरु