मुंबई - आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती आहे. जंयतीला मुंबईसह राज्यभरात रात्री १२ वाजल्यापासूनच जल्लोषात सुरुवात झाली आहे. नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बुद्ध विहारमध्ये गर्दी करत आहेत. यानिमित्ताने राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा आणि मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजनांचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यावेळी कार्यक्रमांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. चैत्यभूमी आणि दिक्षाभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून अनुयायी येत आहेत.
दादर येथील चैत्यभूमी येथे पहाटेपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल विद्यासागर राव, आनंदराज आंबेडकर, लोकसभा उमेदवार एकनाथ गायकवाड, मिलींद देवरा, राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन केले. जयंतीनिमित्त देशभरात आनंद सोहळा साजरा होत आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तसेच विविध लोकसभा निवडणुकीचे उमेदवारही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येणार आहेत.
आंबेडकरी वस्त्या, बौद्ध विहार लाईटिंग, निळे झेंडे यांनी सजल्या आहेत. लाऊड स्पीकरवर आंबेडकरी गीते वाजवली जात आहेत. घराघरात खीर आणि गोड जेवणाचा आस्वाद घेतला जाणार आहे. संध्याकाळी आंबेडकर जयंती मिरवणूका काढण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये मोठ्या संख्येने पांढरे कपडे परिधान करुन आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. फटाके फोडून उत्साहात जयंतीचा शुभारंभ केला. या निमित्त ईशान्य मुंबईचे लोकसभेचे उमेदवार मनोज कोटक यांनी विक्रोळी येथील बुद्ध विहारात येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच दक्षिण मुंबईचे महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.