मुंबई : राज्यातील महिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांना टोले लगावले. राज्य सरकार हे अतिशय वेगाने काम करीत असून विरोधकांनी चांगल्या कामावर टीका करण्याची गरज नाही. त्या पेक्षा सहकार्याची भूमिका घ्यावी. अजित पवार हे आता सरकारसोबत आले आहेत. विरोधकांसोबत असताना सरकारच्या कामाची गती 20 आणि अजित पवार यांच्या कामाची गती शंभर या वेगाने होती. आता अजित पवारांच्या गतीला मॅच करणारे सरकार त्यांच्यासोबत आहे असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
बचत गटांना बळ देणार : राज्यातील महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांच्या सीआरपी यांच्या मानधनात वाढ करण्यात येत आहे. सीआरपी यांना तीन हजार रुपये मानधन होते ते आता सहा हजार रुपये करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याचा लाभ 54 हजार सीआरपींना होणार आहे तर महिला बचत गटांना देण्यात येणाऱ्या भाग भांडवलात ही वाढ करण्यात आली आहे. पंधरा हजार रुपयांना ऐवजी आता तीस हजार रुपये खेळते भाग भांडवल देण्यात येणार आहे. महिला बचत गटांकडून विविध उत्पादने तयार करण्यात येणार असून या उत्पादनांना युनिटी मॉलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.