मुंबई - प्रत्येकाला वाद करण्याचा अधिकार आहे, पण तो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून झाला पाहिजे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही विरोध करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणाच्या मांडवामध्ये अडथळा आणू नका, असे आवाहन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात वाद सुरू केले. 'वाद करा, पण प्रथम संवाद करा. चर्चेतून प्रत्येक अडचणीचा मार्ग निघतो. यामुळे माझ्याविरोधात जे वाद निर्माण करत आहेत, त्या सर्व मित्रांना माझे आवाहन आहे की, आपण भेटून चर्चा करू', असे फादर दिब्रिटो म्हणाले. राज्यात मराठीमध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि इतर साहित्यिकांनी मोठे साहित्य निर्माण केले आहे. मात्र, एका ख्रिश्चन लेखकाला संमेलनाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर वेगळया दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.