मुंबईSurrogacy Issue : सरोगसीसंदर्भातील एका महत्वपूर्ण खटल्यात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. सरोगसीसाठी दात्यांचे शुक्राणू आणि अंडी वापरता येतील का, या प्रश्नावर नाही असं उत्तर केंद्रानं दिलं आहे. यासंदर्भातील एका खटल्यात केंद्रानं हे उत्तर दिलं आहे. असं केल्यानं पालकांचं बाळाशी भावनिक नातं निर्माण होण्याची शक्यताच नाही. सरोगसीमुळे काही मातांचं शोषण होतं. अशा प्रकारची माहिती देऊन केंद्रानं प्रतिज्ञापत्रात यावर आक्षेप घेतला आहे. तसंच यासंदर्भातील याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. केंद्राच्या सरोगसी नियमनासंदर्भातील नियमांना आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश केंद्र शासनाला दिले होते. त्यानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. मात्र त्याला उत्तर देताना केंद्राची भूमिका चुकीची मूलभूत हक्कावर गदा आणणारी असल्याचं तज्ञ वकील रमा सरोदे यांनी म्हटलेलं आहे.
सरोगसीचे नियम काय सांगतात - केंद्रानं मुंबई हाकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सरोगसीसाठी दात्यांचे शुक्राणू आणि अंडी वापरता येतील का, यावर नाही असं उत्तर केंद्रानं दिलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की, दात्यांची अंडी आणि शुक्राणू सरोगसीसाठी वापरता येत नाहीत कारण अशा प्रकारे जन्मलेल्या मुलांच्या पालकांचे मुलाशी 'मजबूत भावनिक बंध' नसण्याची 'शक्यता' असते. नवीन सरोगसी नियम सरोगसीसाठी केवळ सेल्फ-गेमेट्सना परवानगी देतात. प्रतिज्ञापत्रात असंही नमूद केलं आहे की, सेल्फ-गेमेट्सऐवजी 'डोनर गेमेट्स'पासून जन्मलेल्या मुलाला जैविक दृष्ट्या संबंध नसलेल्या पालकांकडून नाकारलं जाऊ शकतं. ज्या पालकांनी गेमेट दान केलं आहे ते जर जिवंत राहिले नाहीत किंवा जोडपं वेगळं झालं तर जन्मलेल्या बाळाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे याला परवानगी देता येणार नाही. तज्ञ संस्थेचंही असं मत आहे की, मुलाचं हित सर्वोपरी आहे. यासंदर्भातील देणगीदारांच्या गेमेट्स वापरण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळण्याची विनंती या प्रतिज्ञापत्राद्वारे केंद्रानं केली.
सरोगसी नियमनाची गरज का लागली - गेल्या काही वर्षांमध्ये देशात सरोगसीच्या नावाखाली अनैतिक प्रथा, सरोगेट मातांचं शोषण, सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुलांना नाकारणं अशा गोष्टी घडू लागल्या. तसंच मानवी गेमेट्स आणि भ्रूणांच्या आयातीसह आंतरराष्ट्रीय सरोगसी केंद्र म्हणून देशात सरोगसीनं निर्माण होणारे प्रश्न निदर्शनास आले. म्हणूनच या सगळ्या गोष्टींना चाप बसणे गरजेचे होते. त्यासाठी भारतानं 2021 चा सरोगसी नियमन कायदा पास केला. सरोगसी नियमन कायद्यात असं स्पष्टपणे नमूद केलं आहे की, सरोगेट आईचा सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुलाशी अनुवांशिक संबंध असू नये. त्याचवेळी मूल अनुवांशिकरित्या इच्छुक जोडप्याशी किंवा इच्छुक एकल आईशी संबंधित असलं पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी इतरही महत्वपूर्ण नियमन करणारी कलमं या कायद्यात टाकण्यात आली आहेत.