मुंबई: डॉक्टरला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन डाॅक्टरांना पोलीस ठाण्यात नेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पट्ट्याने मारहाण करत पैसे उकळल्याचा खळबळजनक प्रकार कांदिवलीमध्ये घडला आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसह येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कर्तव्यातील त्रुटींवरुन, शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन:पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलला दोन डॉक्टरांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे सुरुवातीला या डॉक्टरांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना समता नगर पोलीस ठाण्यात बराच वेळ उभे ठेवण्यात आले. नंतर पुढे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस नाईक अशा दोघांनी मिळून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप डाॅक्टरांकडून करण्यात आला आहे. पीडित डॉक्टरांनी समता नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधून, आपल्यासोबत पोलीस ठाण्यात घडलेली धक्कादायक प्रकार सांगितला आहे.