ममता बॅनर्जी यांचे वकील मजीद मेमन मुंबई :राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज अंशता दिलासा दिला आहे. शिवडी कोर्टाने काढलेला समन्स सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात समन्स इश्यू करण्याची योग्य प्रोसेस फॉलो झाली नाही, असे निरीक्षण न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नोंदवले आहे.
प्रोसेस योग्य पद्धतीने फॉलो करण्याचे निर्देश : न्यायालयाने असे म्हटले की, मूळ तक्रारदाराला शिवडी कोर्टात पुन्हा मागणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवडी कोर्टानं ती प्रोसेस पुन्हा योग्य पद्धतीनं फॉलो करावी, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहे. मूळ तक्रारीवर आधारित दावा पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. भाजपचे नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्रगीताचा अवमान केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता याचिका दाखल केली होती.
शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात तक्रार : मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर उभे राहून राष्ट्रगीताच्या केवळ दोन ओळी म्हणून त्या कार्यक्रमातून निघून गेल्या. ही क्लिप सोशल मीडियावर पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. बॅनर्जीचे कृत्य म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर असून राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायदा 1971 नुसार त्या शिक्षेस पात्र असल्याचा दावा गुप्ता यांनी केला.
ममतांचे मुंबई सत्र न्यायालयात आव्हान : दंडाधिकारी न्यायालयाने 2 मार्च 2022 रोजी ममता बॅनर्जी यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी जेष्ठ कायदेतज्ज्ञ माजिद मेमन यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने त्यांच्या दौऱ्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर दाखल करण्यासाठी सरकारी वकिलांनी वेळ मागितला. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 3 जानेवारी रोजी निश्चित केली आणि तोपर्यंत दंडाधिकारी न्यायालयाच्या कारवाईला दिलेली स्थगितही कायम ठेवली.
काय आहे प्रकरण? : ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. चार-पाच ओळी गायल्यानंतर त्या थांबल्या असं तक्रारीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे, राष्ट्रगीताचा अपमान केला तसेच संपूर्ण देशाचाही अपमान केला, असे टीका करण्याऱ्यांनी म्हटले आहे.