मुंबई:उत्तर महाराष्ट्र विभागातून शिंदे गटातून सुहास कांदे तर भाजपमधून महिला मंत्री म्हणून देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांची नावे चर्चेत होती; (Ajit Pawar Rebellion) मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आदिती तटकरे यांना महिला मंत्री म्हणून सामावून घेण्यात आले आहे. (Ministerial Oath) त्यामुळे या दोन महिला मंत्र्यांचा पत्ता कट होतो. तर उत्तर महाराष्ट्रातील मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विधान परिषदेतील आमदार अनिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने या तीनही इच्छुक आमदारांना आपल्या आकांक्षेला मुरड घालावी लागली आहे. (Ministerial Candidates)
मराठवाडा: मराठवाड्यातील औरंगाबाद मधील अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांची यापूर्वीच मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संजय शिरसाट हे आमदार आपला मंत्रिमंडळात समावेश होणार असा सातत्याने दावा करत होते. मात्र, आता नव्या रचनेत त्यांना स्थान मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील धनंजय मुंडे, संजय बनसोड यांना मराठवाड्यातून स्थान दिले गेले आहे. आता मराठवाड्यातील संजय शिरसाट यांना मंत्रीपद आणि पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र:पश्चिम महाराष्ट्रमधून सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम शिंदे या दोन भाजपच्या आमदारांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केली होती. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातून दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदी स्थान देण्यात आले आहे. मुश्रीफ आणि पडळकर यांच्यामध्ये प्रचंड विरोध आहे. त्यामुळे आता पडळकर यांना मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. तर राम शिंदे यांना जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.