मुंबई :मुंबई शहरात आणि उपनगरातील अनेक उद्याने ही दुरावस्थेत आहेत. या उद्यानांच्या संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार भारती लवेकर, आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. मुंबईतील उद्यानांची अतिशय दुरावस्था झाली आहे. या उद्यानात कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत, तसेच सुरक्षेसंदर्भातही कोणत्याही उपाययोजना नाही, याकडे सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारने याची गांभीर्याने दखल घेतल्याचे सांगितले.
उद्यानांचा डीपीआर बनवण्यास आयुक्तांना आदेश :दरम्यान, यासंदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील असून, मुंबईतील सर्व दुरावस्थेतील आणि सर्वच उद्यानांच्या विकासासाठी ताबडतोब विकास आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश महापालिका आयुक्तांना देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. विकास आराखडा तयार करून संबंधित उद्यानांमध्ये वीज, पाणी, शौचालय यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच, मुंबईतील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण करून करण्यात येतील. मुंबई शहरातील पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गालगत प्रत्येकी दहा अद्ययावत शौचालये उभी करण्यात येतील.