मुंबई- श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि एकोप्याचा संदेश देण्यासाठी विविध सामाजिक संस्था सीएसएमटी परिसरात जमल्या होत्या. रविवारी दहशतवाद्यांकडून श्रीलंकेत वेगवेगळ्या ठिकाणी आत्मघाती साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. ज्यामध्ये ३०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले होते. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदविला जात आहे. भारतातही या हल्ल्याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीलंकेतील हल्ल्याविरोधात मुंबईत निदर्शने भारत बचाव मोर्चा, महात्मा गांधी विचार मंच, ऑल इंडिया मिल कॉन्सिल, इस्लामिक कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र या संघटना श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र आल्या होत्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मोठीबोरवला उपस्थित होते.
द्वेष, हिंसा, धर्माचे राजकारण आता बंद करून बंधूभाव व गांधी विचार रुजविण्याची गरज आहे, असे सांगत हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आणि संघटनांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रीलंकेत इस्टरच्या पवित्र दिवशी ३ चर्च आणि ५ पंचतारांकीत हॉटेलवर हल्ला करण्यात आला.
असे हल्ले कोणत्याही देशाच्या कोणत्याही भागात झाले तरी सर्व धर्माच्या आणि सर्व देशांच्या नागरिकांनी याचा निषेध करण्याची गरज आहे, असे पत्रकार जतीन देसाई यांनी सांगितले. हा हल्ला घडविण्यासाठी ६ महिन्यांहून अधिकचा काळ नियोजन करण्यासाठी गेला. स्थानिक दहशतवादी संघटनांना इसीसचे मोठे पाठबळ मिळाले आहे. गांधींच्या विचारांना चालना देण्याची गरज आहे, अशा भावना सर्व नागरिकांच्या आहेत, असे फिरोज मिठीबोरवला यांनी सांगितले.