मुंबई -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयातील वर्धापन सोहळ्याला मुंडे हजर होते. त्याच कार्यक्रमाला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अर्धा डझनहून अधिक मंत्री उपस्थित होते. यामुळे मंत्र्यांमध्येही भीतीचे वातावर निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायक, पीएस, ड्रायव्हर यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल रात्री उशिरा आल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसांपूर्वी मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री, नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासोबतच माजी खासदार समीर भुजबळ, आमदार किरण पावसकर यांच्यासोबत अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.