पंढरपूर (सोलापूर) - आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. पंरपरेनुसार प्रतिवर्षी आषाढीला येणाऱ्या संतांच्या पालख्यांच्या भेटीला आणि स्वागताला पंढरपुरातून संत नामदेव महाराजांची पालखी वाखरीला जाते. वाखरी येथील संताचा मेळा पाहून सर्वच वारकरी आनंदून जातात. वाखरीतील संतांच्या भेटीचे महत्व सांगणारा ईटीव्ही भारतने केलेला हा विशेष वृत्तात...
हेही वाचा-आस विठुरायाच्या भेटीची : जगद्गुरू तुकोबारायांची पालखी पंढरीकडे रवाना
वाखरी येथे संत नामदेव महाराज यांच्या मानाची पालखी -
आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीत दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. त्यामुळे यंदा प्रातिनिधीक स्वरूपात हा पालखी सोहळा पार पडणार आहे. मात्र, वारीच्या पंरपरेत खंड पडू नये म्हणून वाखरी ते पंढरपूर या पायीवारीला सरकारने परवानागी दिली आहे. दरम्यान, पंढरपुरात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संताचा मेळा वाखरी येथे पाहायलाा मिळतो.
हेही वाचा-Ashadhi wari : पांडुरंगाच्या महापुजेची तयारी पूर्ण; विठुरायासाठी मंदिर समितीकडून खास पोशाख
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलांच्या भेटीस आलेल्या प्रमुख संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संताचा भेटीचा सोहळा परंपरेने वाखरी येथे पार पडतो. यावेळी या सर्व संताच्या स्वागतासाठी पंढरपुरातून संत नामदेव महाराजांची पालखी या संतांच्या पालख्यांच्या भेटीसाठी वाखरीत येते. संत नामदेव महाराज हे पंढरपूर येथील वतनदार म्हणून ओळखले जाते त्यांच्या मानाच्या नामदेव महाराज पालखी शिवाय कोणत्याही पालख्या पंढरपुरात प्रवेश करत नाहीत. संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळा वाखरीत पोहोचल्यानंतरच इतर संतांच्या पालख्या पंढरीत प्रवेश करतात, अशी वारकरी संप्रदायाची पंरपरा असल्याची माहिती नामदेव महाराजांचे सतरावे वंशज मुरारी महाराज नामदास यांनी दिली.
हेही वाचा-भेटी लागी जीवा : टाळ मृदुंगाच्या गजरात बसने संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
नामदेवांच्या समर्पित विठ्ठलभक्तीची साक्ष -
आषाढ महिना, वद्य त्रयोदशी, नामदेव महाराजांनी विठ्ठलमंदिराच्या शेवटच्या पायरीवर बसून मस्तक श्री चरणी ठेवले आणि ते अनंतात विलीन झाले. ती नामदेवांची पायरी प्रसिद्ध आहे. संत नामदेव पायरी जवळ नामदेव महाराज यांच्या कुटुंबातील अकरा जणांनी समाधी घेतल्याची नोंद इतिहासात आहे. नामदेव दरवाजा पंढरपुरात अजूनही नामदेवांच्या समर्पित विठ्ठलभक्तीची साक्ष देतो.
संत नामदेव महाराजांची भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत...
संत नामदेव महाराजांनी जीवनभर विठ्ठल नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगरचना केली. त्यातील साधारण ६२ अभंग नामदेवजी की मुखबानी या शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी आणि तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वर यांचे चरित्र सांगितले आहे. अशा अनेक नोंदी संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून सांगण्यात आले आहे.