मुंबई -रुग्णालयाबाहेर झालेले मात्र, विविध प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे एक हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आलेले नाहीत. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी एक पत्र पाठवले आहे.
मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही आकडेवारीत दाखवण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे. तरीही हा आकडा अजून जाहीर करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असे किमान एक हजार मृत्यू मुंबईत झाले आहेत. प्राथमिक माहिती संकलनातच आत्तापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृतांच्या संख्येत त्याच दिवशी किंवा 72 तासांत नवीन नोंद होणे आवश्यक आहे. मात्र, तीन महिने लोटले तरी रुग्णालयाबाहेरील मृतांची नोंद झाली नाही. हे मृत्यू लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून त्यांचा यादीत समावेश करणे ही अतिशय चुकीची रणनीती आहे, असे फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे.