मुंबई -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. २१ व्या शतकात भारत जी प्रगती करत आहे त्याच्या मागे डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची प्रेरणा आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठल्याही धर्म ग्रंथापेक्षा संविधानाला महत्त्वाचे म्हटले आहे, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले कोरोनाच्या संकटात गर्दी न करण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्याला आंबेडकर अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिल्याचा आनंद आहे. डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा अवलंब करणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे. आपल्या राज्यात जात पंचायती विरोधात कायदाही केलेला आहे. तरीही समाजात काही चुकीच्या प्रवृत्ती असतात. त्या ठेचल्या पाहिजेत, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांबरोबर यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केल्याचा आनंद -
काल (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होईल असे त्यांनी जाहीर केले. तर, मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याचेही ठाकरेंनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याबाबत आपल्याला आनंद वाटत आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने बदलू शकतो हे व्हिजन त्यांच्या देखील लक्षात आले आहे. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राचा मागास भाग मुंबईशी जोडला जाऊ शकतो. सुरुवातीला या प्रकल्पाला त्यांचा विरोध होता आता मात्र, ते महामार्गाच्या बाजूने आहेत याचे समाधान आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मान्यवरांनी केले अभिवादन -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर मंत्री यांनी सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असे आवाहन यावेळी सर्वांनी केले.