मुंबई:उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नांना आज उपमुख्यमंत्री, भाजप नेते, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या भाषणामध्ये फक्त निराशा होती आणि तेच तेच मुद्दे होते. काही नेते फक्त शिवराळ भाषा वापरतात. राज्याचा विकास, शेतकऱ्यांच्या जीवनातील परिवर्तन, रोजगार निर्मिती यावर ते एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा एक प्रोजेक्ट ते दाखवू शकत नाहीत की ज्याच्यावरती ते बोलू शकतील? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. यामुळेच ठाकरेंची निराशा यातून बाहेर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ते जेवढे त्यांना शिव्या देतील तेवढे ते मोठे व प्रसिद्ध होतील, असेही फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?जळगावात, पाचोरा येथे काल (रविवारी) सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट आव्हान केले होते. येणाऱ्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप लढणार आहे, हे त्यांनी जाहीर करावे असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. तुम्ही आमच्याकडून चोरलेले धनुष्यबाण घेऊन या, तर भाजपने मोदींचा चेहरा घेऊन यावे; परंतु मी माझे नाव घेऊन येईन. नंतर बघू महाराष्ट्र कोणाला निवडून देतो? असे आव्हान ठाकरेंनी केले. सध्या सर्वत्र आग दिसत असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. तुमची हिम्मत असेल तर निवडणुका लावा, आमची तयारी आहे. आम्ही मशाल घेऊन येतो तर तुम्ही धनुष्यबाण घेऊन या असे सांगत मर्द असाल तर या महाविकास आघाडीच्या वज्रमूठीचा सामना करून दाखवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडवणीस सरकारला केले.