महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फडणवीसांच्या दाव्यानं महायुतीत संघर्षाची ठिणगी, जागावाटपाचा तिढा वाढला - ajit pawar

Mahayuti Seat Sharing : देवेंद्र फडवणीस यांनी, भाजपा लोकसभा निवडणुकीत २६ जागा लढवेल असा दावा केल्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये नाराजीचं चित्र आहे. त्यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटाची धाकधूक वाढली असून, या मुद्यावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी पडू शकते.

Mahayuti Seat Sharing
Mahayuti Seat Sharing

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 9:41 PM IST

मुंबई Mahayuti Seat Sharing : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन दिवसांपूर्वी, भाजपा राज्यात लोकसभेच्या २६ जागा लढवेल, असं वक्तव्य केलं होतं. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. जर भाजपा २६ जागा लढवत असेल, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला २२ जागा येतील. परंतु त्यानंतर फडणवीस यांनी आपल्या वक्तव्याबाबत घुमजाव करत, अजून फॉर्मुला ठरायचा आहे, असं सांगितलं. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. फडणवीस यांनी असं व्यक्तव्य करून आपली इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. आता याच मुद्द्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते.

फडणवीस यांचा परस्पर दावा? : नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपानं देशभर कंबर कसली असून यासाठी राज्यात मिशन ४५ राबविण्यात येत आहे. याच अनुषंगानं भाजपानं राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदार संघाचा आढावा घेतला. महायुती राज्यात ४० ते ४२ जागा जिंकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मात्र फडणवीस यांच्या २६ जागा लढवण्याच्या वक्तव्यानंतर शिंदे गटासह अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. महायुतीमध्ये तीन घटक पक्ष (भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) असताना, त्यांच्याशी चर्चा न करता देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर २६ जागांचा दावा केल्यानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

चर्चेनंतरच फॉर्मुला ठरेल : देवेंद्र फडणवीस सोमवारी नागपूरमध्ये बोलताना म्हणाले की, "आमच्यामध्ये अजून चर्चा व्हायची असून कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही. चर्चेनंतरच फॉर्मुला ठरेल". परंतु यामध्ये यापूर्वी जिंकलेल्या जागांना जास्त प्राधान्य देण्यात येणार असून, त्याचबरोबर निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार केला जाणार असल्याचं ते म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, "अजून बैठक व्हायची असून बैठकीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील", असं त्यांनी सांगितलं.

भाजपचा सर्वेनंतर दावा :सध्या राज्यात भाजपाचे २३ खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे १३ खासदार असून, अजित पवार यांच्यासोबत १ खासदार आहे. भाजपानं राज्यातील सर्व ४८ मतदार संघाचा सर्वे केला असून, जागा कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतात याबाबत रणनीती सुद्धा आखली आहे. यानंतरच फडणवीस यांच्याकडून २६ जागांचा दावा केला गेला.

..तर युतीमध्ये संघर्ष होऊ शकतो : दुसरीकडे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. आता या १८ जागांवर शिंदे गट दावा ठोकणार यात दुमत नाही. वास्तविक शिंदे गटाची १९ जागांची मागणी आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील १० ते १२ जागांसाठी आग्रही असून, त्यांनी त्यासाठी तयारी सुद्धा सुरू केली आहे. परंतु जर फडणवीस यांच्या दाव्यानुसार, शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण २२ जागा मिळत असतील त्यांच्यामध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. अजित पवार यांना १० ते ११ जागा दिल्या तर ते त्यांना मान्य असेल. मात्र शिंदे गट ११ ते १२ जागांवर कधीही तडजोड करणार नाही. नेमका हाच मुद्दा युतीतील संघर्षाला कारणीभूत ठरू शकतो.

शिंदे गटाचा १८ जागांचा दावा :जागा वाटपाच्या विषयावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे म्हणाले की, "फडवणीस यांनी २६ जागांवर दावा करून राज्यातील भाजपाची ताकद स्पष्ट केली. परंतु आम्ही या फॉर्मुल्यावर कदापि तयार होणार नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची घोडदौड व्यवस्थित सुरू असताना अजित पवार यांना नाहक सरकारमध्ये एन्ट्री देण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाली. त्यांच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आणि आमचे अनेक आमदार मंत्रीपदापासून वंचित राहिले. यामुळे आम्ही लोकसभेच्या २२ जागांवर आग्रही आहोत. सध्या आमचे १८ खासदार असून इतर ४ जागांवर सुद्धा आमचा विजय होऊ शकतो. जेव्हा महत्त्वाचे नेते याबाबत चर्चेला बसतील तेव्हा हा सर्व लेखाजोखा मांडला जाईल. परंतु अद्याप तरी यावर जास्त भाष्य करणं उचित होणार नाही", असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

  1. सरकार अस्थिर आहे? राहुल नार्वेकरांनी थेटच सांगितलं, संजय राऊतांनाही टोला
  2. 'धर्मवीर' काहींना खटकला, पण आम्ही आता 'ऑपरेशनच करुन टाकलंय'; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
  3. छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात बोलावं, 'ओके' सरकारमध्ये स्पष्टता नाही - सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details