महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Aditya Thackeray : निंदकाचे घर असावे शेजारी; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ऑगस्ट क्रांती मैदानात 'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 9, 2023, 3:09 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : विकासकामांना विरोध करण्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मुंबईचा कायापालट होत आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुशोभीकरण मुंबईत सध्या सुरू आहे. मात्र अशा प्रकारच्या कामांना विरोध करण्याचे काम सध्या सुरू असून त्यासंदर्भात दररोज पत्र लिहिले जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन : आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावरील क्रांती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ऑगस्ट क्रांती मैदानात 'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आपल्या देशातील स्वातंत्र्याची खरी चळवळ 9 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवसापासून सुरू झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरोधात 'चले जाव' चा नारा त्यांनी आजच्या दिवशी दिला. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्य पाहू शकत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक हुतात्म्यांसमोर नतमस्तक होण्याचा दिवस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निंदकाचे घर असावे शेजारी : या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मुंबईत विकासाची चांगली कामे सध्या सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे प्रशासक चहल चांगल्या पद्धतीने काम करत असून त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्याची टीका फडणवीसांनी केली.

रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुशोभीकरण मुंबईत सध्या सुरू आहे, मात्र अशा प्रकारच्या कामांना विरोध करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासंदर्भात दररोज एक पत्र लिहितात. अशाच प्रकारचे एक पत्र त्यांनी स्वतःला 25 वर्षांपूर्वी लिहिले असते तर कदाचित मुंबई अजून चांगली झाली असती. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई बदलत आहे : चहल तुम्ही चांगलं काम करत आहात. मात्र जसे निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात, तसे ते रोज तुमच्यावर बोट उचलतील. त्यामुळे त्यांना बोट उचलण्याची संधी देऊ नका. पारदर्शी प्रामाणिकतेने एकेक काम तुम्ही करा. मुंबई तुम्ही बदलली आहे. येत्या काळामध्ये खड्डेमुक्त मुंबई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण कराल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आयुक्त इकबाल चहल यांच्या कामाचे कौतुक केले.

हेही वाचा-

  1. Fadnavis On Bhide : भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात स्पष्टोक्ती
  2. Mumbai News : महाराष्ट्राच्या २११२ कोटींच्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाला केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाची मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details