मुंबई-नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मृत डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आता १९ जूनला निर्णय होणार आहे.
राज्य सरकारने डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा खर्च सुद्धा राज्य सरकारने करायला हवा, अशी मागणी तक्रारदार पक्षाचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
फिर्यादी पक्षाचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या मागणीवर सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करीत म्हटले की, या गुन्ह्याच्या न्यायालयीन सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास काही वेळ व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी पोलीस विभागातर्फे राज्य शासनाशी बोलणी सुरू आहे. यास काही दिवस लागतील.
राज्य सरकारचा वेळ काढूपणा-
यावर तक्रारदार पक्षाचे वकील अॅड. सदावर्ते यांनी हा राज्य सरकारचा हा वेळ काढूपणा असून कलम १५ चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नाही तोपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. यावर दोन्ही पक्षांचे बोलणे ऐकून न्यायालयाने या संदर्भात १९ जून पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.