मुंबई- गणेशोत्सवाला आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. तर बाप्पाला विविध प्रकारच्या दागिन्यांनी सजवण्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. इमिटेशन ज्वेलरीला सर्वाधिक मागणी असून ती घेण्यासाठी प्रसिद्ध लालबाग मार्केटमध्ये गर्दी होऊ लागली आहे.
बाप्पाच्या आगमनाची लगभग सुरु; इमिटेशन ज्वेलरीला मागणी वाढली - Ganesh Festival
मुंबईत बाप्पाच्या आगमनाची लगभग सुरु झाली आहे. तर विविध प्रकारच्या दागिन्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. इमिटेशन ज्वेलरीला सर्वाधिक मागणी असून ती घेण्यासाठी प्रसिद्ध लालबाग मार्केटमध्ये गर्दी होऊ लागली आहे.
सोन्यासारखी चमक देणारी, कॉपर मायक्रो प्लेटिंगपासून बनविलेल्या विविध इमिटेशन दागिन्यांनी दादर, लालबागमधील दागिन्यांची दुकाने सजली आहेत. लालबाग मार्केटमध्ये इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात कर्णफुल, बिगबाली, सोंड पट्टा, मोत्यांचे हार, कडे, असे विविध प्रकारचे दागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गौरीसाठी मंगळसूत्र, मोत्याची माळ, मुकुट, लक्ष्मीहार, कंबरपट्टा आदी दागिने येथे उपलब्ध आहेत.
दरवर्षी मोठ्या गणेश मंडळांची दागिने बनविण्याची ऑर्डर आम्हाला येते. कर्णफुलांच्या पॅटर्नला भाविकांची जास्त पसंती असते. त्या-त्या गणेश मंडळांच्या दागिन्यांच्या पॅटर्न मागणीनुसार दागिने बनवून दिले जातात. हार, बाजूबंद, मोत्यांचा हार, कडे, सोंडपट्टा, कर्णफुले, मोदक आदी इमिटेशन ज्वेलरी दुकानात उपलब्ध झाली आहेत, असे भवानी आर्टच्या विकास चौधरी यांनी सांगितले.