महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2020, 7:12 PM IST

Updated : Oct 27, 2020, 8:29 PM IST

ETV Bharat / state

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट.. हर्ड इम्युनिटी नव्हे हे ट्रेसिंग-टेस्टिंग-ट्रिटमेंटचे यश

गेल्या काही दिवसांपासून कोरोना संख्येत घट होत आहे. त्यामुळे राज्यात हर्ड इम्युनिटी तयार झाल्याची चर्चा रंगली आहे. पण तज्ज्ञांनी हर्ड इम्युनिटी नव्हे तर याचे श्रेय राज्य सरकारच्या ट्रेसिंग-टेस्ट-ट्रीटमेंट या त्रिसूत्रीला तसेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेला जात असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Decrease in the number of corona in the state
राज्यात कोरोना संख्येत घट

मुंबई -मागील सात महिन्यांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू होता. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती, तर कोरोनाची भीती ही वाढत होती. पण मागील पंधरा दिवसात मात्र कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. मागील आठ दिवसांत तर कोरोना रुग्णांची संख्या 18 ते 24 हजाराहून थेट 5 ते 8 हजारांवर आली असून सोमवारी (26 ऑक्टोबर) तर राज्यात केवळ 3,645 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यात हर्ड इम्युनिटी तयार झाल्याची चर्चा रंगली आहे. पण तज्ज्ञांनी मात्र हर्ड इम्युनिटी तयार झाल्याचे आताच म्हणता येणार नाही. मात्र जी रुग्णसंख्या कमी होत आहे त्याचे श्रेय राज्य सरकारच्या ट्रेसिंग-टेस्ट-ट्रीटमेंट या त्रिसूत्रीला तसेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेला जात असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात कोरोना संख्येत घट, तज्ज्ञांची प्रतिक्रिया
मुंबईसह राज्यात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ही बाब दिलासादायक मानली जात आहे. दरम्यान राज्यातीलच नव्हे तर देशातील ही रुग्ण संख्या कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी जिथे दिवसाला 95 हजार रुग्ण आढळत होते तिथे आता हा आकडा 55 हजारावर आला आहे. तेव्हा या निमित्ताने आता वेगवेगळ्या चर्चानाही वेग आला आहे. यातील प्रमुख चर्चा म्हणजे आता देशात हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे आणि त्यामुळेच कोरोना रुग्ण कमी झाले आहेत, असे म्हटले जात आहे. पण तज्ज्ञांनी मात्र ही शक्यता पूर्णतः फेटाळून लावली आहे.

..तेव्हाच म्हणता येईल हर्ड इम्युनिटी तयार झाली -

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी ही हर्ड इम्युनिटी तयार झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्णांना कोरोनाची लागण होऊन गेली असावी. त्यानुसार भारतातील रुग्ण संख्या विचारात घेता आजच्या रुग्णसंख्येच्या चौपट रुग्णांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे मानले तरी हा आकडा 4 कोटीच्या पुढे जात नाही. जेव्हा देशातील 91 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊन जाईल तेव्हा हर्ड इम्युनिटी तयार झाली असे म्हणता येईल. 91 कोटी आणि 4 कोटी यात खूप फरक आहे. त्यामुळे अद्याप हर्ड इम्युनिटी तयार झाली असे म्हणता येणार नसल्याचे डॉ भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारच्या त्रिसुत्रीनेच कोरोना नियंत्रणात -

आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय लोंढे यांनी याबाबत संमिश्र मत व्यक्त केले आहे. हर्ड इम्युनिटी कदाचित तयार झाली असावी. पण याचे योग्य उत्तर केवळ आयसीएमआरच देऊ शकते. त्यामुळे आयसीएमआर म्हणेल तेव्हाच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. पण एक मात्र नक्की आहे, की देशातील रुग्णसंख्या कमी होत असून याचे सर्व श्रेय सरकारच्या उपाययोजनांच द्यावे लागेल. अगदी ट्रेसिंग-टेस्ट-ट्रीटमेंट या त्रिसूत्रीपासून ते माझे कुटुंब माझी जबाबदारी पर्यंतच्या मोहिमेला याचे श्रेय जाईल. सरकार आणि पालिकेसह सर्व जिल्ह्यातील त्या-त्या सरकारी यंत्रणेने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले असून या प्रयत्नांना यश आल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचेही डॉ. लोंढे यांनी सांगितले आहे.

..अन्यथा कोरोनाची दुसरी लाट येईल

रुग्णसंख्या कमी झाली आहे ही दिलासादायक बाब आहे. पण हर्ड इम्युनिटी तयार झाली या गैरसमजात राहत नागरिकांनी बेजबाबदार वागू नये, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे. संख्या कमी झाली म्हणजे कोरोना कमी झाला असे नाही. नियमांचे कडक पालन करतच कोरोनाला दूर ठेवता येणार आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टनसिंग, सॅनिटायझर याचे पालन करायचे. अन्यथा कोरोनाची दुसरी लाट आली तर आश्चर्य वाटायला नको. तेव्हा सणासुदीच्या काळातही नियमांचे कडक पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Last Updated : Oct 27, 2020, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details