मुंबई -भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 81 वर्षीय वरवरा राव यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. वरवरा राव यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने उपचार सुरू आहेत. राव यांच्या कुटुंबीयांकडून जामीन याचिका दाखल करण्यात आलेली असून यावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू होती.
एनआयएने केला जामीनाला विरोध
राष्ट्रीय तपास यंत्रणेने वरवरा राव यांच्या जामिनाला विरोध केला होता. याचिकेत म्हटले आहे की, वरवरा राव यांच्यावर लावण्यात आलेले कलम हे खुपच गंभीर असून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ते मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे सांगण्यात आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांकडून नोव्हेंबर 2018 मध्ये 5 हजार 5 आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत यांचे सुद्धा नाव आहे.