मुंबई -राज्यात सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची पहिली संयुक्त बैठक आज वरळी येथील नेहरू सेंटर येथे पार पडली. या बैठकीनंतर, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी तयार असल्याच्या वृत्ताला शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'कडे दुजोरा दिला आहे. या बैठकीत तीनही पक्षांच्या नेत्यांकडून सकारात्मक चर्चा झाली असल्याची प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर दिली आहे.
या बैठकीत कुठलाच विषय अडचणीचा ठरला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. काही विषयांवर चर्चा बाकी असून त्यासाठी उद्या पुन्हा बैठक होईल व लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले.