मुंबई Death Threat to Mukesh Ambani :रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडं 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केलीय. तसंच जर पैसे दिले नाही तर जीवे मारु असं धमकी देणाऱ्यानं म्हटलंय. मुकेश अंबानींना ईमेलद्वारे धमकी आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय. उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी आल्यानं खळबळ उडालीय.
ईमेलमध्ये काय लिहिलंय : सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर अज्ञात व्यक्तीनं 27 ऑक्टोबर रोजी धमकीचा ईमेल पाठवला होता. त्यात लिहिलं होत की, 'तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू, आमच्याकडं भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत' असा मजकूर इंग्रजीत लिहिलेला होता. यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन मुंबईतील गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केलाय.