मुंबई- मंत्रालयातील सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रीती लोकेश अत्राम-धुर्वे (वय ३१) यांचा नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. लोकसभा निवडणुकीचे काम बळजबरीने करायला लावल्यामुळेच प्रीती यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
निवडणुकीतील कामाच्या तणावाने मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू प्रीती यांची दोन जुळी मुले ही दीड वर्षाची असून पत्नीच्या जाण्याने पतीची प्रकृती अस्वस्थ झाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तर प्रीती यांचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेत ते गावी घेऊन निघाले असल्याचेही सांगण्यात आले.
प्रीती अत्राम-धुर्वे यांना १८ एप्रिलला कावीळ झाली होती. त्यासाठी त्या उपचार घेत असल्याने आपल्याला रजा मिळावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज केला होता. मात्र, शिवडी विधानसभा मतदार संघातील जिल्हा निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी त्यांना रजा दिली नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
कावीळ झाला असतानासुद्धा त्यांनी १० दिवस उन्हात काम केले. त्यातच २९ एप्रिल रोजी मुंबईतील मतदानाच्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सूरु करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याने आज त्यांचा मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
प्रीती यांचा मृत्यु हा निवडणूकीच्या कामातील तणावामुळेच झाला आहे. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.