मुंबई - गोपाळकाला काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादिवशी अनेक गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत असतात. त्यासाठी शहरातील प्रभादेवी येथील प्रभा-विनायक सोसायटीच्या यंग प्रभादेवी क्रिडा मंडळाच्या गोंविदांनी थर लावण्याचा सराव सुरू केला आहे.
मुंबईत गोपाळकाल्यासाठी दहीहंडीच्या सरावाला जोमाने सुरुवात बालगोपाळासाठी दहीहंडी मोठा उत्साहाचा सण आहे. यादिवशी दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना अनेक अपघात होत असतात. त्यामुळे या थरांच्या उंचीवर अंकुश लावण्यात आला आहे. नियमांचे पालन करत दहीहंडीच्या दिवशी कुठल्याही बालगोपाळाला दुखापत होऊ नये तसेच सुरक्षितरित्या दहीहंडी साजरी करता यावी यासाठी प्रभादेवी मंडळ सरावाला लागले आहे. त्यासंबंधीचे मार्गदर्शन बालगोपाळांना करण्यात येत आहे.
सोसायटीच्या आवारात रात्री साडेनऊ ते 12 वाजेपर्यंत नियमितपणे चार ते पाच थरांचा सराव करण्यात येतो. यासाठी ३० ते ४० युवक हजर असतात. सराव करताना कोणालाही दुखापत होऊ नये यासाठी त्यांना बेल्ट आणि डोक्यात घालण्यासाठी हेल्मेट दिले जाते. तसेच जमिनीवर रबर मॅट, प्लास्टिक टाकण्यात येते असल्याचे त्यांचे प्रशिक्षक ऋग्वेद नाईक म्हणाले.
बालगोपाळांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाचा विमा देखील काढण्यात आला आहे. कोणाला दुखापत झाल्यास त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येतात. तसेच दहीहंडीच्या माध्यमातून जमा झालेला निधी बालगोपाळांच्या खर्चासाठी वापरण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी दिली.
मराठमोळा पारंपरिक सण असलेल्या दहीहंडी उत्सवाला स्पर्धात्मक दृष्टीकोनाने बघू नका. तसेच चढाओढ न करता प्रत्येक मंडळांनी दहीहंडी दिवशी खबरदारी घ्यावी. तसेच बालगोपाळांना दुखापत होणार नाही यासाठी सुरक्षिततेची साधने वापरावी, असे आवाहनन मंडळाच्यावतीने करण्यात आले. तसेच राज्य सरकारच्या नियमानुसार व न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाचे पालन करूनच थरांची मर्यादा पाळणार असल्याचे मंडळाचे कार्यवाह किसन सारंग यांनी सांगितले.