मुंबई : Dahi Handi २०२३ : मुंबईत आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमध्ये महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाण्यातील गोविदांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला : 'सेलिब्रिटी दहीहंडी' अशी ओळख असलेल्या दादरमधील आयडियल बुक डेपो येथील दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सुविधा येथील दहीहंडी, मनसेची दहीहंडी या दादर परिसरातील दहीहंडी आकर्षणाचा विषय असतात. आज सकाळपासूनच तिथे गोविंदा पथकांनी हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मागील महिनाभरापासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
अंध मुली आणि मुलांची दहीहंडी :दादर येथे नयन फाउंडेशन या अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मुलींची तीन थरांची तर मुलांची चार थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडीला सलामी दिली. आम्ही या संस्थेच्या अध्यक्षांशी संवाद साधला. ते म्हणाले. नयन फाउंडेशन संस्था अंध मुलांचा मनोरा रचणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. आम्ही मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. यावर्षी देखील आम्ही आमची परंपरा कायम राखत मुलं आणि मुलींचे थर लावले आहेत.
तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक : देशभरात दहीहंडी उत्सव हा आनंदात साजरा केला जातो. दहीहंडीचं प्रमुख आकर्षण असते ते गोविंदा पथक. महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव (Dahi Handi) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. (First Transgender Govinda Pathak) यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक पुण्यात दहीहंडीत सहभाग घेतला आहे. हे राज्यातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक आहे.