मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यात विदर्भ आणि मराठवाडा या भागांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याबाबत हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
विदर्भ-मराठवाड्याला गुलाबचा फटका
शुभांगी भुते यांनी म्हटले आहे, की 'गुलाब चक्रीवादळामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मुसळाधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांमध्येसुद्धा जाणवेल. त्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा प्रामुख्याने समावेश आहे. 27 सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाडा आणि 28 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान नागरिकांनी खबरदारी घ्यावी'.
आज अतिमुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (27 सप्टेंबर) चंद्रपूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, नंदूरबार, परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या या जिल्ह्यांना इशारा
तर, 28 सप्टेंबरला मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. नंदूरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
29 सप्टेंबरला या जिल्ह्यांना इशारा
तर, 29 सप्टेंबरला चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात कमी होताना दिसेल. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा -परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन, पोलीस यंत्रणेचेही दुर्लक्ष