महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावधान! मुंबईत वाढतेय सायबर गुन्ह्यांचे प्रमाण; तपास संथ

मुंबई शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. मागील नऊ महिन्यात हे प्रमाण जास्तच आहे. लॉकडाऊन काळात सर्वच जण घरी असल्याने ऑनलाइन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. याचाच फायदा घेत विविध पद्धतींचा वापर करत सायबर चोरट्यांनी नागरिकांची बँक खाती रिकामी केली आहेत.

Cyber Crime
सायबर क्राईम

By

Published : Oct 29, 2020, 1:29 PM IST

मुंबई -कोरोना संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले. याचकाळात नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग व इतर डिजिटल व्यवहारांच्या माध्यमांतून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या 9 महिन्यात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे आलेल्या तक्रारींच्या तुलनेत तपास झालेल्या गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील सायबर गुन्ह्यांचा घेतलेला आढावा

गुन्हे वेगात, तपास संथ -

लॉकडाऊन दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडले. याचा आढावा घेतला असता जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात 1 हजार 700 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील केवळ 115 सायबर गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने लावला आहे.

बनावट लिंकद्वारे होते लूट -

कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशात सिनेमा हॉल, मॉल्स, करमणुकीची इतर साधने बंद असल्यामुळे घरात बसून नागरिक विविध डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. याबरोबरच आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटचाही वापर वाढला आहे. भारतात सध्या नेटफ्लिक्स वापरकर्त्यांची संख्या 20 लाखांपेक्षा जास्त असून महाराष्ट्रात याचा सर्वाधिक वापर होत आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. नेटफ्लिक्स संदर्भात बनावट एसएमएस, व्हाट्सअ‌ॅप मेसेज, ई-मेलच्या माध्यमातून वापरकर्त्यांना नेटफ्लिक्सचे सदस्यत्व वैयक्तिक माहिती न दिल्यास स्थगित केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. नेटफ्लिक्स पेमेंट न केल्यास 24 तासात नेटफ्लिक्स सबस्क्रीप्शन रद्द होईल असाही मेसेज येतो. सायबर गुन्हेगार बनावट पेमेंट गेटवेची लिंक पाठवून संबंधित व्यक्तीच्या बँकिंग संदर्भात, डेबिट व क्रेडिट कार्ड संदर्भात सर्व माहिती चोरत असल्याचे उघड झाले आहे.

दाखल झालेले विविध गुन्हे (कंसात तपास झालेल्या गुन्ह्यांची संख्या)..

संगणकाच्या सोर्स कोड सोबत छेडछाड करण्या संदर्भात मुंबई पोलिसांकडे 1 (0) गुन्हा दाखल झाला, असून संगणकांच्या कार्यप्रणालीवर हल्ला करण्याच्या 8 (1) घटना घडले आहेत. इंटरनेटवर फिशिंग-हॅकिंग व नायजेरियन फ्रॉड संदर्भात एकूण 26 (4) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ई-मेल, एसएमएस व एमएमएसच्या माध्यमातून सायबर लूट करण्याच्या संदर्भात 165 (60) गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. समाज माध्यमांवर बनावट प्रोफाईल व अश्लील फोटो मॉर्फ करण्यासंदर्भात 23 (6) गुन्हे नोंदवण्यात आले. क्रेडिट कार्ड फसवणुकी संदर्भात तब्बल 374 (11) गुन्हे गेल्या नऊ महिन्यात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे नोंदवण्यात आले. डिजिटल फसवणुकीच्या संदर्भात इतर गुन्ह्यांमध्ये 1 हजार 103 (33) नोंदी झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details