मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून लवकरच विविध राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत. अशातच प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून साम, दाम, दंड, भेदचा वापर करून निवडणुकीत उभे राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. आचारसंहितेच्या काळात आपल्या प्रतिस्पर्धकांवर कुरघोडी करण्यासाठी बऱ्याच वेळा प्रचाराच्या नावाखाली समाज माध्यमांचा वापर करत प्रत्येक पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ता हे एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना दिसतात. या सर्व गोष्टींचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये, म्हणून राज्याच्या सायबर सेलकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे सायबर सेल सज्ज झाले असून आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांवर सायबर सेलची करडी नजर असणार आहे. निवडणुकीच्या काळात प्रचार करताना सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक समाजात, गटात, धर्मात वाद निर्माण करणे किंवा निवडणुकीच्या कार्यप्रणालीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या अनुषंगाने सायबर सेल समाज माध्यमांच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. यासंदर्भातील प्रत्येक दिवशीचा आढावा निवडणूक आयोगाला सायबर सेलकडून दिला जात आहे.