मुंबई CSMT Kurla Railway Track:मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे उपनगरीय रेल्वे गाड्यांचं स्थानक अत्यंत गजबजलेलं असतं. मध्य रेल्वेवर प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळं प्रवाशांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देता याव्यात आणि कमी वेळेत सुकर प्रवास व्हावा, यासाठी मध्य रेल्वेनं पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या रेल्वे स्थानकादरम्यान करण्याचा निर्णय 2010 मध्ये घेतला होता. या निर्णयाला तब्बल बारा वर्षे झालीत. तरी अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळं आता या कामाची किंमत सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांनी वाढली आहे, असं मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय.
काय आहे प्रकल्प :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सध्या उपनगरीय गाड्यांसाठी चार मार्गिका वापरल्या जात आहेत. मार्गिका क्रमांक एक, दोन या मार्गिकांवरून धीम्या गाड्या धावतात, तर मार्गिका क्रमांक तीन आणि चारवरून जलद गाड्या धावत असतात. कुर्ला ते कल्याण दरम्यान पाच आणि सहा क्रमांकाची मार्गिका आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाची मार्गिका नसल्यानं उपनगरीय गाड्यांसोबतच लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या चालवण्यावर अडचणी येत होत्या. या दृष्टीनं विचार करून 2010 मध्ये एमएमआरबीसीच्या माध्यमातून एमयुटीपी दोन या प्रकल्पांतर्गत कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचं काम करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तेव्हा प्रकल्प खर्च सुमारे 537 कोटी रुपये आराखड्यानुसार प्रस्तावित करण्यात आला. मात्र, अद्यापही या मार्गीकेचं काम सुरू न झाल्यानं प्रकल्प खर्चात मोठी वाढ झालीय. आता हा खर्च 890 कोटी रुपयांवर पोहोचलाय.