मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळच्या पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्तांच्या समोर सादर करण्यात आला आहे. त्यानुसार ५ अभियंते आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकाला जोडणारा हिमालय हा पादचारी पूल गुरुवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत सहा पादचाऱ्यांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले. पूल दुर्घटनेची जबाबदारी कुणाची याबाबत २४ तासांत अहवाल द्या, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी सकाळी अधिकाऱयांची बैठक घेऊन याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती.
त्यानंतर मुख्य अभियंता (दक्षता विभाग) यांना पूल दुर्घटनेची चौकशी करुन २४ तासात प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश दिले. स्ट्रक्चरल ऑडिटरची भूमिका काय होती, याचीही पाहणी करण्यास सांगितले. आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त (दक्षता) विवेक मोरे यांनी घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला.
सीएसएमटी जवळील हा पूल चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटर डी.डी. देसाई यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये दिला होता. या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची शिफारस देसाई यांनी केली होती. पुलांच्या ऑडिटमध्ये निष्काळजी व बेपर्वाई करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तांनी तात्काळ कारवाई करीत या पुलाच्या ऑडिटचे देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन, कार्यकारी अभियंत्याची खातेनिहाय चौकशी, पूल विभागाच्या दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची चौकशी आणि ठेकेदार व स्ट्रक्चरल ऑडिटर यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अशी झाली कारवाई-
कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि एस. एफ. काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येईल. प्रमुख अभियंता (पूल) एस. ओ. कोरी (सेवानिवृत्त), उपप्रमुख अभियंता आर.बी. तरे, प्रमुख अभियंता ए. आय. इंजिनीयर यांची खात्या अंतर्गत चौकशी करण्यात येईल. तसेच, दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीचे काम दिलेल्या आर. पी. एस. इन्फ्रास्ट्रक्चरच्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.