महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना योद्ध्यांकडेच दुर्लक्ष, मुंबई पालिकेतील सी. पी. एस. निवासी डॉक्टरांची तक्रार

मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांच्या समस्यांकडे लक्ष दिले जाते, त्यांना सर्व सुविधा दिल्या जातात. मात्र, सी. पी. एस. डॉक्टर आजही 14 हजार 800 रुपये स्टायपेंड घेत आहेत. हॉस्टेलमध्ये दयनीय अवस्थेत राहत आहेत. तेव्हा आमच्याकडेही लक्ष द्या, स्टायपेंड वाढवा असे म्हणत हे डॉक्टरही आता आक्रमक झाले आहेत.

cps doctors facing  problems
सी. पी. एस. निवासी डॉक्टरांची तक्रार

By

Published : May 27, 2020, 4:06 PM IST

मुंबई - कोरोनाच्या लढ्यात सध्या सर्वात महत्त्वाची भूमिका इंटर्न आणि निवासी डॉक्टर बजावत आहेत. अशात मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात असलेल्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) संलग्नित निवासी डॉक्टरांना मात्र दुर्लक्षिले जात आहे. त्यांना कोणी वालीच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सी. पी. एस. डॉक्टर आजही 14 हजार 800 रुपये स्टायपेंड घेत आहेत. हॉस्टेलमध्ये दयनीय अवस्थेत राहत आहेत. तेव्हा आमच्याकडेही लक्ष द्या, स्टायपेंड वाढवा असे म्हणत हे डॉक्टरही आता आक्रमक झाले आहेत.

एमबीबीएस झाल्यानंतर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम घेण्यासाठी हजारो विद्यार्थी नीट परीक्षा देतात. नीट पास होणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना रँक अभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही असे विद्यार्थी कॉलेज ऑफ फिजिशियन अँड रिसर्च संलग्नित पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पर्याय निवडतात. असे अंदाजे 4 हजार डॉक्टर राज्यभर आहेत. तर मुंबईत पालिका रुग्णालयात सी. पी. एसचे अंदाजे 500 डॉक्टर कार्यरत आहेत.

आज हे सर्व डॉक्टर कूपर, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, ट्रॉमा केअर अशा पालिकेच्या रुग्णालयात कोरोनाशी दोन हात करत आहेत. असे असताना सी. पी. एस. डॉक्टरांना कोणतीही स्टायपेंड वाढ मिळालेली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे डॉक्टर 14 हजार 800 रुपयात रूग्णसेवा देत आहेत. तर इथे राहण्या-खाण्याची सोयही व्यवस्थित नसल्याचा आरोप कूपरमधील डॉक्टरांनी केला आहे. छोट्या खोलीत तीन जण राहतात तर जेवणासाठी दररोज किमान 250 रुपये लागतात आणि रोजचा इतर खर्च वेगळलाच. यामुळे आमच्या हातात काहीच उरत नाही, अशी व्यथा या डॉक्टरांनी सांगितली.

याशिवाय सी. पी. एस. अभ्यासक्रमातील स्त्रीरोग, बालरोग आणि पॅथालॉजी हे तीन अभ्यासक्रम सोडले तर इतर अभ्यासक्रमाला मेडिकल कौंसिल ऑफ इंडियाची मान्यता नाही. त्यामुळे इतर अभ्यासक्रमातील डॉक्टर एमडी-एमएस झाल्यानंतर त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळत नाही. ही मोठी समस्या दूर करण्यासाठी हे डॉक्टर गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे. आता कोविडच्या लढ्यात हेच डॉक्टर योद्ध्यांप्रमाणे लढत आहेत. तेव्हा आता तरी आमचे महत्त्व सरकारला समजावे आणि आमच्या समस्या दूर कराव्या इतकीच मागणी असल्याचेही हे डॉक्टर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details