मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आहे. पालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बूस्टर डोस देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेकडून रुग्णालयांची यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 वॉर्ड मधील काही ठराविक लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. पालिकेकडून देण्यात येणारा हा डोस इंट्रानेसल म्हणजेच नाकावटे दिला जाणारा असून, केवळ ज्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसची आवश्यकता अशांनाच तो देण्यात येईल. अशी सूचना देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत बूस्टर डोस घ्यायचा असल्यास पालिकेने ज्या लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे तिथेच घ्यावा लागणार आहे.
यादी महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध-पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस iNCOVACC असून याची निर्मिती भारत बायोटेक या कंपनीने केली आहे. ही लस इंट्रानेसल असून ती नाकावाटे घ्यावी लागते. पालिकेच्या 24 वॉर्ड मध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असणार आहे. या रुग्णालयांची यादी पालिकेने सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध केली असून, ही यादी तुम्हाला पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व पालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पाहता येईल.