मुंबई -राज्यात लसीकरणाने वेग घेतला असला तरीही अद्याप कित्येक लोकांना लसीची दुसरी मात्रा मिळालेली नाही. महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी एका विशिष्ट समुदायातील लोक लस घ्यायला बजावत नसल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे अशा लोकांचे समुपदेशन करण्याची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
धर्मगुरूंशी बोलणार
काही विशिष्ट समुदायातील लोक धर्मगुरूंचे आवाहन पाळतात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे धर्मगुरूंशी बोलून लसीकरणाबाबत समाजातील लोकांना आवाहन करण्यात यावे, अशी विनंती करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे.
डिसेंबरपर्यंत लसीकरण होणार पूर्ण
राज्यातील लसीकरणाने आता वेग घेतला असून आतापर्यंत सव्वानऊ कोटी जनतेला लस देण्यात आली आहे. यापैकी सुमारे तीन कोटी लोकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. हा वेग आता आणखी वाढविण्यात येणार असून येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जनतेचे लसीकरण कसे पूर्ण करता येईल. यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोनाची तिसरी लाट निष्प्रभ
कोरेनाची तिसरी लाट येईल, अशा पद्धतीची शक्यता होती. मात्र, नवरात्रोत्सवानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाची तिसरी लाट निष्प्रभ ठरत असल्याचे दिसून येत असल्याचा दावाही आरोग्य मंत्र्यांनी केला आहे.
हेही वाचा -समीर वानखडे तातडीने दिल्लीला जाणार; खंडणी प्रकरण संदर्भात दिल्लीत बोलवले