मुंबई -कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशभर 8 जानेवारीला संपाची हाक दिली आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता संपाचे निमंत्रक व कामगार नेते विश्वास उटगी यांनी वर्तवली आहे. शिवसेना प्रणित कामगार संघटना तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या आंदोलनाला पाठींबा दर्शवल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे वाहतूक, रेल्वे व विमानसेवा बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्याचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांची प्रतिक्रिया संपामध्ये 269 कामगार संघटना उतरणार -
रेल्वे कर्मचारी काळ्या फिती लावून वेगवेगळ्या स्थानकांवर आपला निषेध व्यक्त करून संपाला पाठींबा दर्शवणार आहेत. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, भारतमाता, अंधेरी स्टेशन वसई पालघर कुर्ला भांडुप या मुख्य शहर व उपनगरातील ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. तसेच आझाद मैदान येथे 11 ते 3 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने विविध संघटनांचा एकत्र मेळावा होणार आहे. यात रॅली निदर्शने करण्यात येतील. भायखळा, सीएसएमटी, मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचारी काळी फित बांधून निदर्शने करतील. सगळ्या संघटना आझाद मैदानात एकत्र येऊ शकणार नसल्याने उद्या सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. औद्योगिक संप, फेरीवाले ते माथाडी कामगार अशा सर्व संघटना या संपात सहभागी होणार आहेत. या संपात अत्यावश्यक सेवा सहभागी होणार नसल्याची माहिती उटगी यांनी सांगितली.
संप शांततामय मार्गाने पार पडणार असून, लोक सहभागातून मोदी सरकारच्या कामगार विरोधी निर्णयाला विरोध करणार असल्याची माहिती निमंत्राकांनी दिली आहे. रोजगार निर्मिती करा बेरोजगार थांबवा, अशी मागणी संपाच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्याचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी सांगितले.
हेही वाचा - जेएनयू हल्ला प्रकरण : आयशी घोषसह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल