मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री या खासगी निवासस्थानाजवळ एका चहावाल्याला कोरोना झाल्याचा संशय होता. त्याला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करून त्याची चाचणी केली असता त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चहावाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले पोलीस असल्याची माहिती मिळते आहे.
धक्कादायक!.. मातोश्रीजवळील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील पोलीसही क्वारंटाईन - tea seller near cm house corona positive news
वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान आहे. या निवासस्थानाजवळ असलेल्या चहा टपरीवरील चहावाल्याला कोरोनाची लागण झाली आहे.
वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान आहे. ‘मातोश्री’पासून शंभर मीटर अंतरावर चहाची टपरी आहे. त्या टपरीवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असलेले पोलीस चहा पिण्यासाठी येत असतात. या चहा वाल्याच्या जवळ जेवणासाठीही लोक येत असतात. आज अचानक या चहावाल्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जोगेश्वरी येथील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेव्हा चाचणीमध्ये या चहावाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान या विभागात मुख्यमंत्री राहात असल्याने तातडीने औषध आणि धूर फवारणी करण्यात आली आहे. हा विभाग पोलिसांनी सिल केला असून कंटेंटमेंट एरिया म्हणून घोषित केला आहे. या चहा टपरीवर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस चहा पिण्यासाठी येतात. यामुळे या पोलिसांना वांद्रे येथील उत्तर भारतीय सेवा संघ येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार वांद्रे पूर्व विभागात कालपर्यंत 25 कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यात आता आणखी नव्याने रुग्णांची भर झाली आहे.