मुंबई- कोरोना विषाणूमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल शेतात पडून राहिल्याने जागीच खराब झाला आहे. तसेच काढलेल्या शेतमालाला व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अगदी नगण्य दरात विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आम्ही राज्यातील ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आहे.
लातूर - टंचाईच्या काळात पाण्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी बाग जोपासली. प्रसंगी हातउसने पैसे घेऊन माल बाजारपेठेत दाखल करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पायपीटही केली. मात्र हे सर्व करूनही अखेर द्राक्ष मातीमोलच होणार असल्याचे आता संचारबंदीने पुढे आले आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी परिसर द्राक्ष निर्यातदार म्हणून ओळखला जातो. गतवर्षी पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करीत ठिबकसिंचनाचा वापर केला होता. शिवाय आर्थिक संकटात असलेल्या बागायतदरांनी पैशाची जुळवाजुळव करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे बागाची जोपासणा केली. यामधून कोट्यवधीचा फायदा होईल, अशी स्वप्ने शेतकरी रंगवत होता. व्यापाऱ्यांनी बागा पाहून पसंतीही दर्शिवली. आता तोड होणार म्हणताच कोरोनाचे संकट घोंगावत आले आणि काही दिवसातच होत्याचे नव्हते झाले.
कोरोनाबद्दल देश-विदेशात चर्चा होत असताना त्याचा परिणाम थेट शेतातील बागेवर होईल, याची थोडीही कल्पना शेतकऱ्यांनी केली नव्हती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता देशभर संचारबंदी करण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक देशोधडीला लागले आहेत. वाहतूक ठप्पच असल्याने द्राक्षाचे घड अजूनही वावरातच आहेत. या भागातील द्राक्षे निर्यात होत असतात. मात्र, व्यापारी फिरकतच नसल्याने, घडाने लगडलेली द्राक्षे शेतातच आहेत. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. द्राक्ष निर्यातीसाठी सरकारने मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
----------------------------------
सांगली - कोरोनामुळे द्राक्षांचे आगार असणारा सांगली जिल्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे. संचारबंदीमुळे जिल्ह्यातील सुमारे १८ हजार एकरहून अधिक क्षेत्रावरील अंदाजे १ हजार कोटींचा द्राक्ष माल अजून बागेतच पडून आहे. प्रशासनाने या द्राक्ष वाहतुकीला परवानगी दिली आहे, मात्र तरीही संचारबंदीचा मोठा परिणाम हा द्राक्ष विक्रीवर होणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सांगलीत १८ हजार एकरवरील १ हजार कोटींची द्राक्षे अजून बागेतच आहेत. द्राक्षांचे आगार म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात जवळपास 74 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.
मात्र द्राक्षांचे आगार म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात जवळपास 74 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, प्राण्यांचे द्राक्षबागांवर हल्ले यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. परिणामी जिल्ह्यातील द्राक्षांचे उत्पादन मोठया प्रमाणात घटले आहे. सांगलीत १८ हजार एकरवरील १ हजार कोटींची द्राक्षे अजून बागेतच आहेत. मात्र निसर्गाच्या या संकटाला तोंड देत इथल्या काही शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचे द्राक्ष उत्पादन घेतले आहे. आता ही द्राक्षे तयार झाली आहेत. पण आता येथील शेतकरी आणि द्राक्षबागा कोरोनाच्या महासंकटात सापडल्या आहेत. सर्व द्राक्षबागेतील द्राक्षे ही काढणीला आली आहेत. मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कर्ज, उधार औषधे घेऊन या बागा जगवत चांगल्या प्रतीचे उत्पादन घेतले आहे. तयार झालेला हा माल आता काढणे गरजेच बनले आहे. अन्यथा द्राक्ष घडे सुकून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे आता ही द्राक्षे बागेत अडकून पडली आहेत. सार्वजनिक व खासगी वाहतूकव्यवस्था बंद असल्याने हा माल काढून तर कसा पाठवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
----------------------------------
लातूर - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत आहे. विदेशातील आयात, निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. काढणीला आलेले टोमॅटो विक्री बंद झाल्याने, शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत.
बाजारात एकीकडे टोमॅटोची आवक वाढली असतानाच दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे वैशाली, विरान जातीचे टोमॅटो वावरातच पडून आहेत. मागणीच नसल्याने टोमॅटो जनावरांना टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. कधी निसर्गाच्या अवकृपेने, तर कधी बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यातच आता कोरोना विषाणूचा परिणामही शेतीमालावर होऊ लागला आहे. यापूर्वी सोयाबीनचे दर घटले तर आता टोमॅटो वावरातूनही काढण्यास व्यापारी धजवेना झालेत. एकरभर टोमॅटोला जोपासण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. उत्पादनाच्या आशेवर तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले टोमॅटो आता चक्क जनावरांना टाकावे लागत आहेत.1रुपया किलोप्रमाणे दर मिळत असल्याने टोमॅटोची काढणीही न परवडणारी आहे. त्यामुळे हडोळती येथील विश्वनाथ हेंगणे यांनी दोन एकराच्या फडात जनावरे सोडली आहेत. वैशाली वाणाचे टोमॅटोची विदेशात निर्यात होते. मात्र, सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने निर्यात बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. इतर पिकांप्रमाणे आता टोमॅटोचीही नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
----------------------------------
रत्नागिरी - मच्छिमारी आणि आंबा व्यवसाय हे कोकणातील महत्त्वाचे व्यवसाय आहेत. यंदा पाऊस लांबल्याने आंबा हंगमा लांबणीवर पडला. फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याचे उत्पादन ५० टक्के पेक्षाही कमी आहे. मात्र, या राजाला देखील कोरोनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मच्छीमारी आणि हापूस आंबा या दोन्ही व्यवसायांची हजारो कोटी रुपयांची उलढाल ठप्प झाली आहे.
सध्या आंबा तोडणीसाठी तयार आहे. मात्र, सध्या तयार झालेला आंबा झाडावरच लटकत आहे. आंबा काढून बाजारात पाठवला तरी संचारबंदीमुळे त्याला गिऱ्हाईक मिळत नाही. आंबा हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून रोज 1 लाख पेटी आंबा वाशीच्या मार्केटमध्ये जातो. मात्र, कोरोनामुळे 95 टक्याहून अधिक परिणाम या आंब्याच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे सध्या आंबा बागायतदार चिंतेत आहेत.
आंबा बागायतदारांनी जून 2019 पासून आंब्याच्या कलमाला विविध प्रकारे जपले. नियमित फवारणी, त्याला राखण करण्यासाठी ठेवलेल्या कामगारांवर लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, आता ज्यावेळी हापूस तयार होण्याची वेळ आली त्यावेळी या आंब्याला कोरोनाचे ग्रहण लागले. त्यामुळे या आंब्यावर उपजीविका करणाऱ्या 6 लाख लोकांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. आंब्याच्या बागेवर केलेला खर्च कसा वसूल होणार? असा मोठा प्रश्न आंबा बागायतदारांसमोर आहे.
तिन्ही जिल्ह्यांमध्ये आंबा बागायतदारांवर अंदाजे 1200 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे आंबा बागायतदार प्रसन्न पेठे सांगतात. पहिल्यांदा निसर्ग आणि आता कोरोनाचे संकट यामुळे सध्या आंब्याला ग्राहक नाही. दलाल आंबा विकत नाही. कोणी गाड्या उतरवून घ्यायला तयार नाही. आंबा काढायला परवानगी मिळाली. मात्र, काढून झालेल्या आंब्याला समोर विक्री व्यवस्था नाही. एयर कार्गो, सी कार्गो बंद असल्याने निर्यात पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे दररोज तयार होणाऱ्या आंब्याचे करायचे काय? असा मोठा प्रश्न आंबा बागायतदारांसमोर आहे. त्यामुळे जवळपास 2000 कोटींची उलाढाल ठप्प असल्याचे प्रसन्न पेठे सांगतात.आंबा नाशवंत असल्याने त्याची जोखीम घेण्यास दलाल तयार नाहीत. त्यामुळे तयार झालेला आंबा झाडांवर लटकत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे पूर्णतः नुकसान होत आहे. उत्पादनच बाजारात विकले गेले नाही, तर हा माल नाशवंत असल्याने खराब होणार. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सध्या होत आहे.
----------------------------------
जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात असताना आता कोरोनामुळे केळी उत्पादक शेतकर्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. केळीला मागणी नसल्याने व्यापारी तब्बल 450 ते 600 रुपये कमी दराने केळी खरेदी करीत आहेत.केळीच्या हमीभावाबाबतची समस्या अनेक वर्षांपासूनची कायम आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक बिकट होत जात आहे. शासनाने केळी निर्यातीला परवानगी दिली असली, तरी भावाबाबत सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. व्यापारी आपल्या मर्जीप्रमाणे केळीचा दर ठरवत आहेत.
बोर्डाप्रमाणे केळीचे दर 1200 रुपये क्विंटल इतका आहे. मात्र, कोरोनामुळे केळीला भाव नसल्याचे कारण व्यापारी पुढे करत आहेत. विशेष म्हणजे हेच व्यापारी आपला माल 1200 ते 1400 रुपये दराने इतर राज्यांमध्ये विक्री करत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्याकडून सर्रासपणे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. तसेच शासनानेही कोणतीही मदत जाहीर केली नाही.
----------------------------------