मुंबई - राज्यात नुकतीच लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोरोना योध्यासह आता फ्रंटलाइन योध्यांना ही लस टोचवली जात आहे. तर मुंबईत आता लवकरच तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यासाठी मुंबई महानगर पालिका तयारीला लागली आहे. या तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना अर्थात 50 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तर या गटातील नागरिकांचा आकडा मोठा असल्याने लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी आता पालिका लसीकरण मोहिमेत खासगी रुग्णालयाना सहभागी करून घेणार आहेत. रुग्णालयाची निवड करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून लवकरच रुग्णालयाची नावे जाहीर केली जातील, अशी माहिती सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका यांनी दिली आहे.
आतापर्यंत 75 हजारांहून अधिक योध्यांना लस -
16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणास सुरुवात झाली आहे. मुंबईत 9 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला मुंबईत सुरुवात झाली. आयसीएमआरच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर-नर्स-आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येत आहे. तर नुकतेच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले आहेत. यात फ्रंटलाइन योद्धे अर्थात पोलीस, सफाई कामगार आणि पालिका कामगारांना लस दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत म्हणजेच शनिवारपर्यंत 75 हजारांहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 1 लाख 80 हजार योध्याच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, अशात आता तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्याची तयारी सुरू झाली आहे.