महाराष्ट्र

maharashtra

आज मुंबईत लस येणार! रात्री 12 नंतर मुंबईसाठी कोल्डस्टोरेज कंटेनर निघण्याची शक्यता

By

Published : Jan 12, 2021, 5:35 PM IST

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीच्या वितरणाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज दुपारपासून 6 ते 8 कोल्ड स्टोरेज कंटेनर भरण्याचे काम सुरू आहे. तर हे सर्व कंटेनर रस्ते मार्गे महाराष्ट्र आणि अन्य शेजारच्या राज्यात नेण्यात येणार आहेत.

लसीकरण
लसीकरण

मुंबई- देशभरात लसीकरण सुरू होण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. याअनुषंगाने आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीच्या वितरणाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज दुपारपासून 6 ते 8 कोल्ड स्टोरेज कंटेनर भरण्याचे काम सुरू आहे. तर हे सर्व कंटेनर रस्ते मार्गे महाराष्ट्र आणि अन्य शेजारच्या राज्यात नेण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील काही कंटेनर हे मुंबईसाठी असल्याची माहिती कुणाल अग्रवाल, संचालक, कुल एक्स कोल्ड चैन यांनी दिली आहे. त्यानुसार हे कंटेनर बुधवारी पहाटे चार-पाचच्या सुमारास मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

'त्या' 3 कंटेनरमधील लस 24 राज्यांसाठी

16 जानेवारीला लसीकरण सुरू होणार असून सिरमच्या कोविशिल्ड लशीचा वापर यावेळी केला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने सिरमला 1 कोटींहून अधिक लशीची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर आल्यानंतर सिरम आणि लसीची वाहतूक करणाऱ्या कंपन्या कामाला लागल्या आहेत. आज पहाटे 6 च्या सुमारास 3 कोल्ड स्टोरेज कंटेनर सिरममधून बाहेर पडले. हे सर्व कंटेनर पुणे विमानतळावर दाखल झाले असून आता पुढे विमान मार्गे 24 राज्यात लस पोहचवली जाणार आहे. त्या त्या राज्यातील विमानतळावर लस पोहचल्यानंतर पुन्हा लसीचे कंटेनर त्या त्या राज्यातील कोल्ड स्टोरेज डेपोपर्यंत पोहचवले जाणार असल्याचे कुणाल यांनी सांगितले आहे.

आज रात्री 6 ते 8 कोल्ड स्टोरेज कंटेनर रस्ते मार्गे निघणार

3 कंटेनर आज पुणे विमानतळाला पोहचवल्यानंतर आता आज दुपारपासून 6 ते 8 कंटेनर भरण्याचे काम सुरू आहे. हे कंटेनर रात्री भरून होतील. तर त्यानंतर रात्री 12 नंतर कंटेनर आपल्या नियोजित स्थळाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असल्याचे ही कुणाल अगरवाल यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे हे सर्व कंटेनर रस्ते मार्गे विविध डेपोला जाणार आहेत. पण नेमके कुठे जाणार हे सांगण्यास त्यांनी सुरक्षेच्या कारणाने नकार दिला आहे. पण रस्ते मार्गे हे कंटेनर जात असल्याने ते राज्यातील विविध जिल्ह्यासाठी तसेच शेजारच्या राज्यासाठी असू शकतात असे म्हटले जात आहे. दरम्यान हे कंटेनर नेमके कुठे जाणार हे सांगण्यास कुणाल अगरवाल यांनी नकार दिला असला तरी यातील काही कंटेनर हे मुंबईसाठी आहेत हे मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे. तर रात्री 12 नंतर यातील काही कंटेनर मुंबईसाठी निघतील आणि पहाटे 4 ते 5 च्या सुमारास मुंबईत पोहचतील असेही ते म्हणाले. तेव्हा उद्या मुंबईत लस उपलब्ध होण्याची शक्यता असून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details