महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत लसीकरण पुन्हा सुरू, आठवड्यातून चार दिवस लसीकरण - कोरोना लसीकरण बातमी

कोरोना विषाणूवर मोठा गाजावाजा करत शनिवारी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कोविन ऍपमध्ये अडचणी आल्याने लसीकरणाला दोन दिवस स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता ऍपमध्ये सुधारणा करण्यात आल्याने मुंबईत आजपासून पुन्हा सुरुवात केली जात आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 19, 2021, 8:54 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूवर मोठा गाजावाजा करत शनिवारी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कोविन ऍपमध्ये अडचणी आल्याने लसीकरणाला दोन दिवस स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता अ‌ॅपमध्ये सुधारणा करण्यात आल्याने मुंबईत आजपासून पुन्हा सुरुवात केली जात आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार असे आठवड्यातून चार दिवसात लसीकरण केले जाणार असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरणाला स्थगिती -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेले दहा महिने कोरोना विषाणू विरोधात लढा दिला जात आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी झाला असताना लसीकरण सुरू झाले आहे. १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. लसीकरणाच्या दिवशी ज्या लाभार्थ्यांना लस द्यायची होती. त्यांना एक दिवस आधी मोबाईलवर संदेश पाठवले जाणार होते. मात्र असे संदेश पोहचले नसल्याचे निदर्शनास आले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यावर रात्रभर जागून म्यासेज पाठवण्यात आले. तसेच फोन करून लाभार्थ्यांना लसीकरणाला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. लस घेतल्यानंतरही ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने ऑफलाईन नोंदणी करण्याची मागणी राज्याच्या टास्क फोर्स मार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने त्याला नकार दिल्याने कोविन ऍपमध्ये सुधारणा होई पर्यंत लसिकरणा स्थगिती देण्यात आली.

संग्रहित छायाचित्र
असे होणार लसीकरण -

कोविन ऍपमध्ये सुधारणा करण्यासाठी रविवार १७ आणि सोमवार १८ हे दोन दिवस लसीकरणाला स्थगिती दिली होती. ऍपमध्ये सुधारणा झाल्याने आजपासून पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात केली जात आहे. आठवड्यातून चार दिवस लसीकरण केले जाणार असून महापालिकेच्या ९ केंद्रावरील ४० बुथवर दिवसाला ४ हजार लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर ५०० लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. कोविन ऍपवरून लाभार्थ्यांना मोबाईलवर संदेश जाणार असले तरी पालिकेकडूनही लाभार्थ्यांना संदेश पाठवले जाणार आहेत. त्यांना फोनही केले जाणार आहेत. लसीकरण सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत केले जाणार होते. मात्र आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच लसीकरण केले जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

९ केंद्रावर ४० बूथ -

पालिकेच्या केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, कूपर आणि जंबो कोविड सेंटर या ९ लसीकरण केंद्रांवर ४० लसीकरण बूथ आहेत. या केंद्रांवर दिवसभरात ४ हजार लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. तर राज्य शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details