मुंबई - शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असून बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधी ३२० दिवसांवर पोहचला आहे. महापालिकेच्या २४ विभागांपैकी ‘सी’ विभागात हा कालावधी तब्बल ८०९ दिवसांवर पोहोचला आहे. तर ‘ई’, ‘बी’, ‘एफ-दक्षिण’ आणि ‘जी-उत्तर’ या ४ विभागांमध्ये रुग्ण दुपटीच्या कालावधीने ५०० दिवसांचा कालावधी पार केला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असली तरी कोविडच्या दुस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२० दिवसांवर; कोरोनाचा प्रादुर्भाव कमी - कोरोना पेशंट दुप्पट होण्याचा कालावधी
मुंबई महापालिकेच्या २४ विभागांपैकी ‘सी’ विभागात कोरोनाचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ८०९ दिवसांवर पोहोचला आहे. तर ‘ई’, ‘बी’, ‘एफ-दक्षिण’ आणि ‘जी-उत्तर’ या ४ विभागांमध्ये रुग्ण दुपटीच्या कालावधीने ५०० दिवसांचा कालावधी पार केला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असली तरी कोविडच्या दुस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
असा वाढला कालावधी -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने आज त्रिशतकी टप्पा ओलांडला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा हा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो. महानगरपालिकेने २१ ऑक्टोबर २०२० रोजी रुग्ण दुप्पटीचे शतक गाठले होते. तर २९ ऑक्टोबर रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत म्हणजे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी ५१ दिवसांनी वाढून २०८ दिवस इतका झाला होता. १४ नोव्हेंबर २०२० रोजी रुग्ण दुपटीच्या कालावधीने २५५ दिवसांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर अवघ्या ४ दिवसांत म्हणजेच दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी दिवस संपताना रुग्ण दुपटीच्या कालावधीने ३२० दिवसांवर पोहचला आहे.
हेही वाचा -देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
विभागवार कालावधी -
महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांचा स्वतंत्रपणे विचार करता, रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने ‘सी’ विभागात ८०९ दिवसांचा टप्पा गाठला आहे. तर या खालोखाल ४ विभागांमध्ये ५०० दिवसांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ‘ई’ विभागात ५५७ दिवस, ‘बी’ विभागात ५४६ दिवस, ‘एफ-दक्षिण’ विभागात ५२२ दिवस, तर ‘जी-उत्तर’ विभागात ५०९ दिवसांचा टप्पा गाठला आहे. या विभागांव्यतिरिक्त ३ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा ४०० दिवसांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ‘जी-दक्षिण’ विभाग ४८९ दिवस, ‘एम-पूर्व’ विभाग ४४४ दिवस आणि ‘ए’ विभागात ४३९ दिवस इतका आहे. उर्वरित १६ विभागांपैकी ८ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा ३०० पेक्षा अधिक दिवस असून, या व्यतिरिक्त इतर ८ विभागांमध्ये २०० दिवसांपेक्षा अधिक इतका रुग्ण दुपटीचा कालावधी आहे. तसेच रुग्ण दुपटीचा सर्वात कमी कालावधी हा आर-दक्षिण विभागात असून तो २३६ दिवस इतका आहे.
रुग्णसंख्या वाढीमध्ये घट -
रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीमध्ये देखील लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढीचा दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक असल्याचे मानले जाते. २९ ऑक्टोबर २०२० रोजी असलेला ०.४४ टक्के आणि ५ नोव्हेंबर २०२० रोजी ०.३३ टक्के इतका असणारा रुग्ण वाढीचा सरासरी दर आता ०.२२ टक्के इतका झाला आहे.
लोकांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या चाचण्या सुरू -
महापालिका क्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असली, तरीही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या स्तरावरील सातत्यापूर्ण कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता येऊ दिलेली नाही. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांशी तुलनेने अधिक संपर्क येणा-या व्यवसायिकांची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करुन घेण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात - हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक - वाहक इत्यादींची कोविड विषयक चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे. या चाचणी दरम्यान बाधित रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय औषधोपचार करण्यासोबतच त्यांचे विलगीकरण करणे, समुपदेशन करणे इत्यादी कार्यवाही देखील करण्यात येत आहे.