मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोरोना संकट आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप प्रकरणी आपली भूमिका मांडली. नुकतेच ते माध्यमांशी बोलत होते. कोरोना हे एक राष्ट्रीय संकट आहे, मेडिकल इमर्जन्सी आहे. कोणत्याही विरोधी पक्षाने संपूर्ण विषयाचे राजकारण करू नये. आरोप-प्रत्यारोप करू नये. या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.
"कोरोना एक राष्ट्रीय संकट, विरोधकांना राजकारणासाठी उभा जन्म पडलाय" सरकार आनंदाने लॉकडाऊन करत नाही
महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची भूमिका अचानक बदलली आहे. गुजरातमध्ये हायकोर्ट सांगते की लॉकडाऊन करा. त्यामुळे कुठलेही सरकार आनंदाने लॉकडाऊन करत नाही. ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. एकमेकांना सहकार्य करून विषय मार्गी लावायला हवा, असे राऊत यावेळी म्हणाले.
न्यायालयाचे नियम-कायदे सर्वांसाठी समान हवे
अनिल देशमुख आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकरणी मत व्यक्त करणे योग्य नाही. न्यायालयाचे नियम, कायदे आणि भूमिका सर्वांसाठी समान असायला हव्यात, असे राऊतांनी अनिल देशमुख प्रकरणी म्हटले.
काय आहे अनिल देशमुख प्रकरण?
अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी केले आहेत. यानंतर जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. आता सीबीआयकडून या संदर्भात प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल उच्च न्यायालयाकडे सादर केला जाणार आहे. यानंतर सीबीआयला गरज वाटल्यास दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सीआरपीसीच्या अंतर्गत कारवाई करावी लागणार आहे. यामुळे नैतिकतेनुसार पदावर राहणे योग्य नसल्याचे म्हणत देशमुखांनी आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
विरोधकांना राजकारणासाठी उभा जन्म
महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे काही कठोर निर्णय ठाकरे सरकारला घ्यावे लागत आहेत. पण विरोधक यावरूनही राजकारण करत आहेत. पुढचे काही महिने विरोधी पक्षाने महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोरोनाच्या विरोधातली लढाई लढली पाहिजे. राजकारण करण्यासाठी त्यांना उभा जन्म पडला आहे, असे राऊतांनी म्हटले.
हेही वाचा -शरद पवार यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
हेही वाचा -'मराठा संघटनांकडून मला धमकीचे कॉल्स येत आहेत'