मुंबई - जगभर कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून, जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारतात कोरोनाच्या शिरकावाने सोने खरेदी बंद पडली असून, सोन्याचे भाव उतरले आहेत. सोने खरेदीसाठी ग्राहक दुकानाकडे येत नसल्याचे चेंबूर येथील मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण कोठारी यांनी सांगितले.
कोरोनाच्या भीतीनं सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ - कोरोना विषाणू न्यूज
जगभर कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून, जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारतात कोरोनाच्या शिरकावाने सोने खरेदी बंद पडली असून, सोन्याचे भाव उतरले आहेत. याचा फटका सोने व्यावसायिकांना बसत आहे.
मुंबई शहरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण रोज आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिका तसेच राज्य सरकारकडून विविध उपाययोजना व काही निर्बंध लावले आहेत. सण, उत्सव मोठे कोणतेही कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्यात आल्याने सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकच मिळत नसल्याने व्यवसायिक द्विधा मनःस्थित आहेत. यातच सोन्याचे भाव मधल्या काळात 10 टक्क्यांनी वाढले होते. ते पुन्हा उतरले असून, 40 ते 41 हजार प्रति 10 ग्रॅमवर खाली उतरल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
कोरोना विषाणूची भीती नागरिकांच्या मनातून जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत सोन्याचा व्यवहार सुरळीत होणार नाही. देशात उद्भवलेल्या अशा परिस्थितीमध्ये सरकार व स्थानिक प्रशासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी शहरातील काही दुकाने अदलाबदल करून बंद करण्याची आदेशही काढण्यात आलेले आहेत. त्यात अत्यावश्यक असलेली दुकाने चालू करण्यात यावी. सरकारला व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सोन्याची दुकाने बंद केल्याचे चेंबूर येथील सराफा व्यवसायिक महेंद्र सुराणा म्हणाले. कोरोनाच्या संकटामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. मोठे नुकासन होत आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. हा कालावधी भरून निघेल मात्र, भारतीय नागरिकांचे स्वास्थ्य व आरोग्य चांगले राहिले तर पुन्हा एकदा व्यवसायातील नुकसान भरून काढता येते. सर्व भारतीयांनी एकत्र येऊन कोरोनाचा लढा देऊ व लवकरच या विषाणूला संपुष्टात आणू असे चेंबूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण कोठारी इटीव्ही भारतला बोलताना सांगितले.