मुंबई :कोकण मंडळातर्फे या पुनर्वसन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या दुर्घटनेमध्ये तळीये गाव आणि शेजारील पाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून तळीये गावातील ६६ दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांसाठी व इतर ६ पाड्यांतील ग्रामस्थांसाठी म्हाडातर्फे २६३ स्वतंत्र घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्टया पुनर्वसन प्रकल्पाच्या कामास जुन २०२२ पासून सुरुवात करण्यात आली.
घरे भूकंप रोधक पद्धतीने :कार्यकारी अभियंता धीरजकुमार जैन यांनी प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले की, दुर्घटनाग्रस्त भागाच्या जवळच जिल्हाधिकारी कार्यालयाने १७.६४ हेक्टर जागा पुनर्वसन प्रकल्पाकरीता 'म्हाडा'ला उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर २६३ पैकी २३१ घरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित ३२ घरांच्या बांधकामासाठी लवकरच शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुर्घटनेचे स्वरूप लक्षात घेता केंद्र शासनातर्फे या जागेचे भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. आयआयटी पवई या संस्थेने सदनिकांच्या बांधकामाचे डिझाईन प्रमाणित करून दिले आहे. प्रत्येकी तीन हजार चौरस फुटाच्या भूखंडावर ६०० चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकारमानाचे स्वतंत्र घर अत्याधुनिक प्री फॅब स्टील स्ट्रक्चर, काँक्रीट सँडविच वॉल पॅनल सिस्टीम वापरून २ बीएचके स्वरूपाचे स्वतंत्र घर बांधण्यात येत आहे. पुनर्वसित घरे भूकंप रोधक पद्धतीने उभारण्यात येणार आहेत.