मुंबई - संभाजी बिग्रेड संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे. यावेळीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणसह राज्यातील मोठे काँग्रेस नेते उपस्थित होते. पुण्यातून प्रवीण गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस निवडणूक कार्यकारिणीची बैठक शनिवारी टिळक भवनमध्ये झाली. या बैठकीत पुणे आणि सांगली मतदारसंघातील उमेदवारीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात रावेत लोकसभेसाठी उल्हास पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सांगली लोकसभेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे मतदारसंघातील उमेदवाराचे नावावर अजुनही निर्णय घेतला नसून उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी, संभाजी बिग्रेड संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेस त्यांना उमेदवारी देईल, अशी चर्चा आहे.