मुंबई- यंदा प्रचंड वाढलेली महसुली तूट आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प फुटल्याने हा ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. हा सलग तिसरा तुटीचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.
यावेळी ते म्हणाले, ही तूट यंदा 20 हजार 292 कोटींवर गेली आहे. हे सरकारच्या अर्थशून्य व नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक, महिला, बेरोजगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा कोणत्याही घटकाला दिलासा मिळालेला नसल्याचे अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या वाढीचा दर आणि राज्यावरील कर्जाचे प्रतिवर्षी वाढणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर अधिकाधिक चिंताजनक बनत चाललेले आहे. कर्जाचा डोंगर कमी करण्याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना सरकारकडे नाही. तरीही सरकारने पुढील विधानसभा निवडणुकीत मते मिळावीत म्हणून या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. परंतु, त्यासाठी पैसा कसा उभा करणार, याची स्पष्टता यात दिसून आली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमलेबाजी’असल्याचे ते म्हणाले.
भयावह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर होईल, असे अपेक्षित होते. मात्र, सरकारने बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. सरसकट कर्जमाफी तर दूरच पण सरकारने राबवलेली शेतकरी कर्जमाफी योजनाही फसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, आजवर 1 कोटी 36 खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ 50 लाख शेतकऱ्यांनाचही मदत मिळाली याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लक्ष वेधले.
दुष्काळाच्या मदतीबाबत सरकारने केलेले दावे वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळग्रस्तांना 4 हजार 461 कोटी रूपयांची मदत वाटल्याचा सरकारचा दावा संशयास्पद आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही थेट भरीव आर्थिक मदत मिळालेली नसून, सरकार प्रामाणिक असेल तर त्यांनी दुष्काळी मदतीच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.