मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसला चांगले यश मिळवायचे असेल तर यापुढे वंचित सोबत आघाडी केलेली बरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी नको, असा सूर मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उमटला. राष्ट्रवादीसोबत विधानसभा निवडणुकीत गेलो तर आपला मूळ जनाधार परत येणार नसल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याचे समोर आले आहे.
आज दादर येथील टिळक भवनात काँग्रेसची आढावा बैठक सुरू झाली असून या बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीत सकाळच्या सत्रात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यां सोबत बैठक झाली.
सकाळी झालेल्या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती करायला हरकत नाही, असे मत व्यक्त केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच आम्ही त्यासाठी सकारात्मक आहोत. मात्र, जो निर्णय घ्यायचा आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.