मुंबई- राज्यात लवकरच होत असलेल्या ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये गरज पडली, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊ, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईत दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही वाचा -''कॅब'साठी पक्षाने भूमिका मांडली आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल'
राज्यात नागपूर, वाशिम, नंदुरबार, धुळे आणि अकोला या ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
हेही वाचा -पुण्यातील गहुंजे बलात्कार प्रकरण : राज्य महिला आयोग सर्वोच्च न्यायालयात
निवडणुका लढताना आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक प्राधान्य देण्यात येईल. यासाठी स्थानिक नेत्यांना अधिकार दिले जाणार असल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती थोरात यांनी दिली. तसेच काँग्रेसची क्षमता अधिक असेल, त्या ठिकाणी मात्र वेगळा विचार होईल. मात्र, क्षमता नाही अशा ठिकाणी दोन्ही पक्षांना सोबत घेऊन या निवडणुका लढवल्या जातील, अशी माहिती थोरात यांनी यावेळी दिली.
'एकनाथ खडसे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच'
भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपमध्ये अनेक नेते हे नाराज आहेत. यातच एकनाथ खडसे हे आमचे मित्र आहेत. ते आमच्यासोबत आले, तर नक्कीच आमचा पक्ष वाढेल आणि आम्हाला त्याचा फायदा होईल, असेही थोरात म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले की, ३ पक्षाचे सरकार असून खाते वाटपामुळे प्रश्न सुटलेले आहेत. अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यामध्ये आम्ही ठरवलेल्या समान कार्यक्रमावर निर्णय होईल, असे थोरात यांनी सांगितले.