मुंबई - देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संभाजी भिडेंवर कारवाई करून अटक करा, अशा प्रकारची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे.
भिडे यांची बुद्धी बुरसटलेली -संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात संताप व्यक्त करत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलणे हे ?भिडे यांना शोभत नाही. भिडे यांची बुद्धी बुरसटलेली आहे. महात्मा गांधी यांच्या करंगळीच्या धुळीची लायकी भिडेंची नसल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे. भिडे स्वतःला सुसंस्कृत असल्याचे समाजात दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भिडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
भिडेंविरोधाक काँग्रेस आक्रमक - संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. सभागृहात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या. भिडे यांच्याविरोधात सरकार नरमाईची भूमिका का घेते? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.
भिडे यांना अटक करा - भिडे यांना इतकी मुभा का दिली जाते? सरकारने सांगावे की आम्ही अशांतता पसरविण्यासाठी असे लोक सोडले आहेत का? असा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. भिडे हे दंगली भडकविण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. यांना सरकारचा अभय आहे. त्यामुळे असा प्रकार आम्ही सहन करणार नाही. भिडे यांच्यावर सरकारने लवकरात लवकर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
जनतेच्या प्रश्नांची चिंता नाही - सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देऊन सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागचे सरकारचे कारण काय आहे? असा कोणता भूकंप होणार आहे त्यासाठी अलर्ट जारी केला का? त्यासाठी दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे. याबाबत ठोस उत्तर सरकारकडून मिळत नाही. दिल्ली येथून त्यांचे आका पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत म्हणून तर दोन दिवस सभागृहाचे कामकाज बंद ठेवले नाही ना? असा प्रश्न काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन पूर्णवेळ व ठरलेल्या कार्यक्रमानुसार व्हावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट उभे ठाकलेले आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत पण या सरकारला जनतेच्या प्रश्नांची चिंता नसून दिल्लीतून येणाऱ्या ‘आका’ची जास्त चिंता असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
काय म्हणाले होते भिडे -महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी असे त्यांचे पूर्ण नाव सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत. असे खळबळजनक वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावतीतील केले होते.
हेही वाचा -
- Sambhaji Bhide : महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार - संभाजी भिडेंचे खळबळजनक वक्तव्य
- Photo Viral: संभाजी भिडेंचा कुंकू लावण्याचा नारा कुठं गेला? सोशल मीडियावर फोटो व्हायरल