मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि. 3) राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना हिंदुत्व, शेतकरी, महागाई, स्वातंत्र्य लढा यावरून भाजपावर टीकास्त्र सोडले. चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून तुकाराम महाराजांच्या अभंगातील पाहिजे जातीचे येरेगबाळे न कामाचे ही ओळ ऐकवली होती. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले, अशी आठवण करुन देत शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, अशा शब्दात समाचार घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री आपली भूमिका सोडून औरंगाबादच्या एखाद्या चौकात शिवसैनिकाच्या नात्याने भाषण केल्यासारखे वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग
संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटले की, काल (बुधवारी) मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे का, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर उपस्थित केला आहे. संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी पाडल्याचा आनंद साजरा केला आणि तिथे उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे?"